कांताई बंधाऱ्यावर मित्र-मैत्रिणींसमवेत सहलीसाठी गेलेला तरुण बुडाला

कांताई बंधाऱ्यावर मित्र-मैत्रिणींसमवेत सहलीसाठी गेलेला तरुण बुडाला

प्रशासनाच्या वतीने तरुणाचा अद्याप शोध सुरू

मंगेश जोशी | जळगाव : येथे गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यात मित्र-मैत्रिणींसमवेत सहलीसाठी गेलेला तरुण बुडाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अन्य चार तरुण-तरुणींना वाचवण्यात इतर मित्रांना यश आले आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नयन योगेश निंबाळकर हा १६ वर्षीय तरुण पाण्यात बेपत्ता झाला असून प्रशासनाच्या वतीने तरुणाचा अद्याप शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या दूध संघाजवळील मिथिला अपार्टमेंट मधील तरुण-तरुणींचा ग्रुप रविवारची सुट्टी असल्याने गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर सहलीसाठी गेला होता. कांताई बंधाऱ्याजवळ असलेले नागाई जोगाई मंदिर परिसरात पाण्याचा आनंद लुटत असताना एका तरुणीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. दरम्यान, तरुणी पाण्यात पडल्याने इतर चार जणांनी तिला वाचवण्याच्या प्रयत्न केला.

यावेळी नयन योगेश निंबाळकर हा १६ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला. तर अन्य मित्र-मैत्रिणींनी पाण्याच्या प्रवाहातून समीक्षा विपिन शिरोडकर, योगिता दामू पाटील, सागर दामू पाटील व अन्य एकास वाचाविण्यास यश मिळाले आहे. मात्र, नयन निंबाळकर हा तरुण प्रवाहात बुडाल्याने बेपत्ता झाला असून अद्याप त्याचा शोध सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com