Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी केली देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्यांदा मिमिक्री; भाजपवर जोरदार हल्लाबोल, पाहा VIDEO
शिवाजी पार्क येथील ‘शिवशक्ती’ सभेत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीचा दबदबा दिसून आला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप-महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रथम बोलत ‘ठाकरे हे ब्रँड नाही, तर विचार आहे, जो कधी संपत नाही’ असे म्हणत भाजपवर टीका केली.
आदित्य ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करत ही निवडणूक ‘गटर, वॉटर, मीटर’ची असल्याचे सांगितले. भाजप नेत्यांच्या मोठमोठ्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करून उपस्थितांमध्ये हशा पाडला. ‘मोदी साहेब, भाजपचा जलवा दिसणार, आपली सत्ता येणार’ मुख्यमंत्री यांच्या स्टाईलने आवाज काढत आदित्य ठाकरे यांनी मिमिक्री केली. यापूर्वी एका कॉर्नर सभेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता याचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा एकदा शिवाजी पार्कमधील सभेत ही मिमिक्री करत भाजपवर जोरदार टीका केली ज्यामुळे सभेला वेगळाच रंग चढला.
फडणवीसांना थेट चॅलेंज देत आदित्य म्हणाले, “भाजप होर्डिंगवर दोन चेहरे दाखवा, मुंबईसाठी त्यांचे काय योगदान? गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला कोणी नेली? उद्योग गुजरातला कोणी हलवले? कोस्टल रोडचे भूमिपूजनाचे फोटो दाखवा, फडणवीस कुठे आहेत?” तसेच, लाडकी बहीण योजनेच्या ३,००० रुपयांच्या संदर्भात ‘लाव रें तो फोटो’ म्हणत राज ठाकरेंची शैली मारली. भाजप नेते अण्णामलाईंनाही टोला लगावत, “तुमचा मतदारसंघ बघा, डिपॉझिट जप्त झाले, आम्हाला मुंबई काय आहे ते सांगू नका” असे म्हटले.
