इतर वस्तू विकणारे रडारवर, ‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे होणार सर्वेक्षण
मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. पण काही स्टॉल्सचा वापर इतर उपयोगासाठी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले.
आरे स्टॉल्सचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड उपस्थित होते. सुनील केदार यांनी आरे उत्पादनाची होणारी स्टाँलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टाँलची संख्या, सध्या प्रत्यक्ष चालवित असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉल्सची संख्या अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.