Eknath Shinde : नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(Eknath Shinde ) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध ठिकाणी नालेसफाईच्या कामांची पाहणी करत महापालिका प्रशासनाला कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नालेसफाईच्या कामात कोणताही अक्षम्य प्रकार खपवून घेतला जाणार नाही. सर्व संबंधित कामे 7 जूनपूर्वी पूर्ण करावीत. नाल्यातील गाळ 48 तासांच्या आत क्षेपणभूमीवर नेऊन विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भांडुपच्या उषा नगर परिसरात, वडाळ्याच्या नेहरू नगर नाल्यावर, तसेच धारावी टी-जंक्शनजवळ नालेसफाईच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत प्रधान सचिव नवीन सोना, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, उपआयुक्त देविदास क्षीरसागर, किरण दिघावकर, संतोष धोंडे आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी हे उपस्थित होते.
मुंबईतील मोठ्या नाल्यांपैकी सुमारे 85% काम पूर्ण झाले असून छोट्या नाल्यांपैकी 65% काम पार पडले आहे. अजून 15 दिवस शिल्लक असल्याने उर्वरित कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वयाने काम सुरू असून, विशेषतः रेल्वे कल्व्हर्टखालील कचरा हटवण्यासाठी रोबोटिक प्रणालीचा वापर केला जात आहे. तसेच, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येतो आहे. मुंबईत दरवर्षी पाणी साचणाऱ्या 422 ठिकाणी पंप बसवले असून, दोन साठवण टाक्या आणि दहा लघु उदंचन केंद्रेही कार्यरत आहेत.
विक्रोळीतील दरड प्रवण सूर्या नगर परिसरातही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, दरवर्षी संभाव्य दुर्घटनांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला. दादर येथील कासारवाडी सफाई कर्मचारी वसाहतीमध्ये जाऊन, तिथे सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका व अन्य उपक्रमांचीही त्यांनी पाहणी केली.