Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन पास दिल्यास कारवाई करण्यात येणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
(Ashadhi Wari 2025 ) पंढरपूर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करत असताना, ‘व्हीआयपी’ पासद्वारे होणाऱ्या दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देत म्हटले आहे की, यात्रा काळात कोणत्याही प्रकारचे विशेष दर्शन पास वितरित करू नयेत.
या सूचनेत प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असून, व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
राज्य शासनाच्या 2010 च्या निर्णयानुसार, यात्रा व सणांच्या प्रमुख दिवशी विशेष दर्शनास बंदी आहे. त्यामुळे यंदा दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन करून भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जर या आदेशाचे उल्लंघन झाले, तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.