Ahilyanagar; धक्कादायक! वकील दाम्पत्याच्या हत्येची कबुली; आरोपींना अटक
अहिल्यानगर- राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घृणपणे खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेल्या हर्षद ढोकणे याने अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात दिली आहे.
बहुचर्चित राहुरी येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांच्या खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील हर्षद ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. आरोपी ढोकणे यांनी मंगळवारी झालेल्या सर तपासणीत खुनाचा घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला आहे.
राहुरी येथील न्यायालयातून आढाव दांपत्याचे अपहरण करून २५ जानेवारी रोजी त्यांना मानोरी येथील त्यांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी किरण दुशिंग यांनी वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, आरोपींनी वकील दाम्पत्याला त्यांच्या चारचाकी वाहनातून ब्राह्मणी गावातील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत नेले.
वकील दाम्पत्याचा खून केल्यानंतर, उंबरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ जाऊन त्यांच्या मृतदेहांना साडीत गुंडाळून विहिरीत टाकून दिले, अशी कबुली माफीच्या साक्षीदाराने न्यायालयासमोर दिली आहे.