Ajit Pawar: अजित पवारांची मोठी खेळी! महाविकास आघाडीला थेट युतीचा प्रस्ताव; महायुतीत अस्वस्थता, नाशिक-पुण्यात राजकीय हालचालींना वेग
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा आणि धक्कादायक राजकीय डाव टाकल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तेत असलेल्या महायुतीचा घटक असूनही अजित पवार गटाने थेट महाविकास आघाडीसोबत (MVA) निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव आल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा आणि धक्कादायक राजकीय डाव टाकल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तेत असलेल्या महायुतीचा घटक असूनही अजित पवार गटाने थेट महाविकास आघाडीसोबत (MVA) निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव आल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे आणि बारामतीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करत निवडणूक लढवली, त्याच धर्तीवर नाशिकमध्येही एकत्र लढण्याचा संदेश आघाडीच्या नेत्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत असतानाच अजित पवार गटाने वेगळा पर्याय उघडल्याने युतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाकरे गटाची सावध भूमिका
या प्रस्तावावर ठाकरे गटाने तातडीचा निर्णय न घेता सावध भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर असा प्रस्ताव आला आहे हे खरे असले तरी त्यावर कोणताही निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार नाही. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची वेगळी रणनीती
दरम्यान, नाशिकमध्ये काँग्रेसनेही मोठी राजकीय खेळी खेळण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मनसेसोबत युतीचा पर्याय पुढे आणला आहे. काँग्रेसकडून जागावाटपाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला असून, मनसे आणि डाव्या पक्षांना सोबत घेण्यावर भर दिला जात आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत पक्षाच्या हायकमांडची भेट घेऊन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात शिंदे गटात असंतोष
दुसरीकडे पुण्यात महायुतीतील जागावाटपावरून शिंदे गटाच्या शिवसेनेत तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. भाजप शिवसेनेला केवळ १० ते १५ जागा देण्याच्या चर्चेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, भाजपसोबतच्या चर्चेत शिवसेनेच्या पारंपरिक ताकदीकडे दुर्लक्ष केले जात असून निष्ठावंतांना डावलले जात आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
एकीकडे अजित पवार गट महाविकास आघाडीच्या दिशेने चाचपणी करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-मनसे युतीची चर्चा आणि पुण्यात शिंदे गटातील असंतोष यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांच्या या मोठ्या खेळीमुळे महायुती टिकणार की नवे राजकीय समीकरण आकाराला येणार, याचा फैसला आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि चर्चांमधूनच स्पष्ट होणार आहे.
