गडकरींच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर तक्रार केली होती.राज्यात महामार्गाच्या कामात शिवसेना कार्यकर्ते अडथळे आणत असतील तर राज्यात काम करावीत का?याचा विचार गांभीर्याने करावा लागेल,अशी तक्रार नितीन गडकरी यांनी केली होती, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले अजित पवार
"तो आरोप असून त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते तपासून पाहण्याची गरज आहे. मागील ३० वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे"
मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक
"मी गेली पावणेदोन वर्ष मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्या दरम्यान अनेक उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचे एकच सांगणे असते. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा कटाक्ष त्यांचा असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा करतील, याबद्दल मला १०० टक्के खात्री आहे. त्यामधून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये" अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.