Akola : 'माझं लग्न होत नाहीये...; अकोला जिल्ह्यातील तरुणाचे शरद पवार यांना पत्र, पत्रात लिहिले की...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Akola) अकोल्यातील एका तरुणाने लग्न जमत नाही म्हणून शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अकोला जिल्ह्यातील एका 34 वर्षीय तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट पत्र लिहून लग्नासाठी पत्नी मिळवून देण्याची अनोखी विनंती केली आहे.
त्याने पत्रात म्हटलं आहे की, 'माझे वय सध्या 34 वर्ष पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस माझे वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही व मी एकटाच राहील. तरी माझ्या जिवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तर्हेने करू शकेल व पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने जगू शकेल.'
'मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे व मुलीच्या माहेरी सुध्दा जाण्यास तयार आहे. मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तर्हेने काम करेल याची हमी देतो. मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून दयावी ही नम्र विनंती. मला जिवनदान द्यावे, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही.' असं या तरुणाने पत्रात नमूद केलं आहे. अकोल्यात झालेल्या शरद पवार यांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात हे पत्र देण्यात आलं. सोशल मीडियावर या पत्राची चर्चा रंगली आहे.
