”शेतीसह किडन्या विकण्याची परवानगी द्या”; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
संजय राठोड । यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा खुर्द गाव फार चर्चेत आले. हे गाव चर्चेत येण्या मागचे कारण म्हणजे स्थानिक प्रशासन रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने गावातील शेतकऱ्यांनी आता महाविकास आघाडी सरकारकडे शेतीसह किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भातील जाहीरातबाजी गावातली चौकावर कऱण्यात आली आहे. दरम्यान आता शेतकरी किडनी विकण्याआधी प्रशासन जागे होऊन रस्ते दुरुस्त करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बाराशे लोकसंख्या असलेल्या नांदुरा खुर्द या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. ग्रामस्थांना दर पावसाळ्यात ये-जा करण्यासाठी रस्त्यावरून मोठी कसरत करून मार्ग काढावा लागतो. १५ वर्षे पुर्वी गावाकडे येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सध्या त्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून अतिशय दुरावस्था झाल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थ आणि नागरिकांनी थेट महाविकास आघाडी सरकारकडे रस्ता करण्यासाठी शेत जमिनी आणि पैसे कमी पडल्यास किडन्या विकण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या अजब मागणीची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.