Ambadas Danve : पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवेंचे सरकारला चार सवाल, ट्विट करत म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Ambadas Danve ) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली असून आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. अंबादान दानवे म्हणाले की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार आहात?
३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही. महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर! असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Summery
पुणे जमीन घोटाळा प्रकरण
अंबादास दानवेंनी साधला सरकारवर निशाणा
'जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?'
