तरूणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या; पोलिसांनी अवघ्या १२ तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या
धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बारकू पाडा परिसरात तुषार देडे हा १८ वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले. या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत अवघ्या १२ तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली.
आरोपी समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते.