Watch Video; अंबरनाथचा मलंगगड परिसर बनला हुल्लडबाजांचा अड्डा

Watch Video; अंबरनाथचा मलंगगड परिसर बनला हुल्लडबाजांचा अड्डा

Published by :
Published on

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसराला निसर्गाचं मोठं वरदान लाभलंय. मात्र हेच वरदान आता काही हुल्लडबाज आणि स्टंटबाज तरुणांमुळे स्थानिकांसाठी शाप ठरू लागले आहे. या हुल्लडबाजीचाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता अशा हुल्लडबाजांना आवर घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाळा सुरू झाला की मलंगगड परिसरात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातून तरुणाई पावसाळी पार्ट्यासाठी गर्दी करते. हा परिसर निसर्ग संपन्न असल्याने मोकळ्या माळरानावर बसून दारूच्या पार्ट्या करण्यासाठी तरुणाई अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मलंगगड परिसरात येऊ लागली आहे. मात्र दारू पार्ट्या झाल्यानंतर हेच तरुण बेफाम होऊन उच्छाद घालतानाचे प्रकार समोर येत आहेत.

या उच्छादाचा एक व्हिडीओ नुकताच स्थानिकांनी चित्रित करून व्हायरल केला आहे. यामध्ये काही तरुण मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करत कारच्या बाहेरील बाजूला लटकून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे मोकळ्या माळरानावर हातात दारूच्या बाटल्या घेऊन मुक्तसंचार करणारे तरुणही कॅमेरात कैद झालेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस मात्र काहीसे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

हा परिसर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र भौगोलिक दृष्ट्या हा परिसर अतिशय मोठा असल्यामुळे या भागात सतत गस्त ठेवणं पोलिसांसाठी सुद्धा अशक्य आहे. याचाच फायदा घेत हे तरुण मलंग गड परिसरात हुल्लडबाजी करताना आढळून येतात. त्यामुळे निसर्गाचं वरदान लाभलेल्या मलंगगड परिसरातली अशी हुल्लडबाजी स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे या हुल्लडबाजांना वेळीच रोखण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com