Amit Thackeray
Amit Thackeray

Amit Thackeray : 'युद्धविराम जाहीर झाला असला, तरी...'; अमित ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Amit Thackeray) अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्वपूर्ण आहेत, याबदल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचे लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.

'आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचे प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून Ceasefire (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.'

'या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा 'विजय यात्रा' (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ पहलगामध्ये घडलेला क्रुर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये 26 निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा. मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.' असे अमिक ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com