ठाण्यात सेना – राष्ट्रवादीत “सोशल मीडिया वॉर”; एकमेकांना डिवचण्याची स्पर्धा
ठाण्यात गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले. या पुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेसबुक वॉर सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना डिवचण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे ठाण्यात दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये आता सोशल वॉर सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी – शिवसेना यांच्यातल्या खारेगावं उड्डाणपुल उद्घाटना दरम्यान मंचावरील कलगीतुऱ्यानंतर आता सोशल मीडियातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचा व्हिडीओ मिम्स वायरल होत आहे. यामध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आणि जुने व्हिडिओ एकत्रित करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
तर दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांचा देखील व्हिडिओ बनवून त्यामध्ये फिल्मी डायलॉगचे मर्ज करून विरोधकांकडून व्हायरल केले जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून नेटकऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत असले तरी राजकीय नेत्यांमध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.
राजकीय पक्षाच्या आयटी सेलकडून अशाप्रकारे व्हिडिओ एडिट करून एकमेकांत सोशल वॉर करण्याचा प्रयत्न आता सुरू झाला असुन लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यात देखील वादाचे वातावरण ठाण्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे ठाण्यात सेना – राष्ट्रवादीच्या या वादामुळे राजकारण तापले आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधला हा वाद संपणार की असाच सुरू राहणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.