वसई-विरार बर्ड फ्लूच्या धर्तीवर खबरदारी म्हणून पालिका करणार शहरातील सर्व पाळीव प्राण्यांची तपासणी

वसई-विरार बर्ड फ्लूच्या धर्तीवर खबरदारी म्हणून पालिका करणार शहरातील सर्व पाळीव प्राण्यांची तपासणी

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क:-संदीप गायकवाड कोरोना नंतर नव वर्षात उभे राहिलेले नवे संकट बर्ड फ्लू ने पुन्हा एकदा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नुकताच पालिकेने खबरदार राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. या रोगाचा प्रसार हा पक्षांच्या मार्फत होत असल्याने पालिकेने आता शहरातील सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची तपसणी करणार आहे. यासाठी पशु संवर्धन विभागाची मदत घेतली जाणार आहे.

वसईच्या लगत असलेल्या ठाणे परिसरात बर्ड फ्लू संदर्भातील घटना समोर आल्याने वसई विरार महापालिकेने अधिक खबदारी घेणे सुरु केले आहे. नुकतेच पालिकेने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून नागरिकांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे सूचना देण्यात आहेत.

नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये कोंबड्या, कावळा, कबुतर किंवा इतर पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याची माहिती त्वरित महानगरपालिका आपत्कालीन विभाग रॅपीड रिस्पॉन्स टीम हेल्पलाईन क्र. ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७ वर कळविण्यात यावी. महानगरपालिकेकडे प्राप्त माहितीनुसार सदर मृत पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल. नागरिकांनी आजारी पक्षी यांच्याबरोबरचा संपर्क टाळावा. संसर्गापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. मांस व अंडी व्यवस्थित शिजवून खावीत. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात बर्ड फ्लू सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्यास रुग्ण भरती करण्याकरिता महानगरपालिकेने विलगीकरण कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच शहरातील मांस/मटण दुकानांचे सर्वेक्षण करून त्यांना दुकानांची स्वच्छता राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर पालिका गृहसंकुलात पाळीव प्राणी, पक्षी यांचे सुद्धा सर्वेक्षण करणार आहे, तसेच या प्राण्यांची/ पक्षांची आरोग्य तपासणी करणार आहे. यासाठी तालुका पशु संवर्धन विभागाची मदत घेणार असल्याचे महापलिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले आहे. सध्या तालुक्यात एकही प्रकरण बर्ड फ्लू चे सापडले नाही यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही असेही आवाहन वसई-विरार महापालिका प्रशासनाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com