Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj Palkhi

Sant Tukaram Maharaj Palkhi : बेलवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला अश्व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे शनिवारी (28 जून) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिला अश्व रिंगण सोहळा भक्तिभावाने पार पडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Sant Tukaram Maharaj Palkhi ) इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे शनिवारी (28 जून) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिला अश्व रिंगण सोहळा भक्तिभावाने पार पडला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुनामाच्या जयघोषात आणि वारकऱ्यांच्या ओढीने परिसर भारावून गेला होता.

पालखी सकाळी बेलवाडीकडे मार्गस्थ झाली. गावात आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. अश्व रिंगणाची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांनी झाली. त्यानंतर टाळकरी, वीणेकरी, तुळशी वृंदावनधारक महिला आणि झेंडेकरी यांच्या रिंगणांनी भक्तीचे वातावरण अधिकच खुलवले.

विठ्ठल भेटीच्या ओढीने अनेक वारकऱ्यांनी वयोमर्यादा विसरून रिंगणात धाव घेतली. या शिस्तबद्ध, उत्साही रिंगण सोहळ्याने सर्वजण भक्तिरसात रंगले. सकाळी सातच्या सुमारास ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात पालखीचे आगमन झाले. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. रिंगणानंतर पालखी काही काळ हनुमान मंदिरात विसावली. आज दुपारी लासुर्णे या ठिकाणी विसावा घेवून त्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी निमगाव केतकीकडे रवाना होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com