महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घ्या : अतुल लोंढे

महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घ्या : अतुल लोंढे

प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी
Published by :
Team Lokshahi

मुंबई: महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, महाज्योतीच्या परिक्षेचा पेपर हा पुण्यातील एक खासगी संस्थेने टेस्ट सिरिज घेतली तोच होता, त्याच संस्थेच्या पेपरमधील प्रश्न महाज्योतीच्या पेपरमध्ये होते. अशा परिस्थितीत त्या संस्थेतील मुलांनाच प्रवेश मिळणार हे उघड आहे. मग गडचिरोली, यवतमाळ, किनवट, नंदुरबार, धुळे, जळगावसह राज्यातील इतर भागातील मुलांना प्रवेश कसा मिळणार? या भागातील मुलांनी काय करायचे? किंवा ज्या विद्यार्थ्यांनी त्या खासगी संस्थेचा क्लास केला नाही त्यांनी काय करायचे? हा प्रश्न आहे.

प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या सामान्य कुटुंबातील मुलांवर हा मोठा अन्याय आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष घालून महाज्योतीच्या परिक्षेत झालेला घोटाळा शोधून काढावा, तसेच फेरपरीक्षा घेऊन मुलांना न्याय द्यावा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com