धक्कादायक! औरंगाबादेत उपवासाला खाल्लेल्या भगरीमुळे 524 जणांना विषबाधा

धक्कादायक! औरंगाबादेत उपवासाला खाल्लेल्या भगरीमुळे 524 जणांना विषबाधा

राज्यभरात हजारो नागरीकांना विषबाधा

मुंबई : राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तीभावाने उपवास करतात. या काळात नागरिकांकडून भगरीचे सेवन केलं जातं. मात्र, हीच भगर त्यांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरात्रीच्या उपवासाला खाल्लेल्या भगरीमुळे राज्यभरात हजारो नागरिकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली असून दुकानावर छापेमारी करत भगरीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यभरात विविध जिल्ह्यातील नागरीकांना विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात भगरीमुळे तब्बल 524 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अन्न आणि औषधी प्रशासनाने भगरीची विक्री बंद केली असून 82 किलो भगर जप्त करण्यात आली आहे. तर, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील 10 ते 12 नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समजते आहे. त्यांच्यावर तिसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालन्यात 40 ते 45 जणांना भगरीतून विषबाधा

जालना जिल्हयातील परतूर तालुक्यात 40 ते 45 जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परतूर येथील समर्थ डिस्ट्रब्युटरकडून संपूर्ण तालुक्यात भगरीचं वाटप केलं जातं. मात्र, याच भगरीतून नागरिकांना विषबाधा झाली आहे. तालुक्यातील वाटूर, खांडवीवाडी, दैठणा आणि शेवगा येथील नागरिकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना भगर खाल्यानं उलटी आणि थरथरीचा त्रास होऊ लागला असल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी परतूर येथील भगर डिस्ट्रब्युटरच्या ठिकाणी छापा टाकून भगर जप्त केली आहे.

बीड जिल्ह्यात 200 लोकांना भगरीतून विषबाधा; एफडीएकडून दुकानांवर छापेमारी

बीड जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच जवळपास 200 जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहीजण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. आज सकाळी पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील गुळज आणि भगवान नगर या ठिकाणी 18 जणांना भगरीतून विषबाधा झाली. त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आली असून मोंढा परिसरातील दोन दुकानांवर छापे टाकून अधिकाऱ्यांनी भगरीचे पोते सील केले आहेत. सध्या भगरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेत. त्यानंतर या दुकानावर कारवाईचा इशारा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com