रस्त्यासाठी निधी मंजूर, तरी खड्डेच खड्डे आणि आमदारांची फक्त बॅनरबाजीच
गोविंद साळूंके, शिर्डी: वाकडी ते श्रीरामपूर रस्त्याचं 9 किलोमीटर अंतर असून रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत. शिर्डी ते शनिशिंगणापूरला जाण्यासाठी हा मधला महत्त्वाचा मार्ग मानला जातो. रस्त्याहून साईबाबांच्या शिर्डीत भावीक पायी पालख्या घेऊन जातात. पालख्या घेऊन जाणाऱ्या भाविकांना खड्ड्यांमुळे पायी चालता येत नाही.
रस्त्यामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहे. गणेश नगर कारखाना एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी देखील हा रस्ता महत्त्वाचा आहे. मोठी वाहने आली तर खड्ड्यांमुळे रस्ता मिळत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी गणेश नगर ते वाकडी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणलेले बॅनर वाकडी गावात सर्वत्र लावले. हार तुरे घेऊन सत्कारही झाले. मात्र अजून प्रत्यक्षात रस्त्याचं काम सुरू न झाल्याने, आमदार आशुतोष काळे यांनी निधी मंजूर झाल्याची फक्त बॅनरबाजी केली असा आरोप वाकडी गावातील ग्रामस्थ करत आहेत.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडावा, अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. 9 किलो मीटरचा हा रस्ता असाच उखडलेला व खड्डे पडलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना,विशेषतः दुचाकीवाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागते. यावर खडी, डांबर टाकून हा रस्ता चालण्यायोग्य बनवावा अशी मागणी वाकडी गावातील नागरिक करीत आहेत. या रस्त्याने रोज शेकडो नागरिक ये-जा करत असतात. या रस्त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणार्या मुलांचे, गरोदर महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल होतात. रस्त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयी करण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांनी आमदारांना अनेक वेळा या रस्त्याची परिस्थिती सांगितली. आंदोलने केली. मात्र कोणताही पुढारी ह्या रस्त्याकडे लक्ष देत नाही आहे.
वाकडी गावामध्ये खंडोबा महाराजांचे मोठे मंदिर आहे. प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या वाकडीमध्ये भाविक जिल्हाभरातून खंडोबाच्या दर्शनाला येत असतात. साईबाबांच्या शिर्डीत अनेक परिसरातील तरुण साई संस्थान भोजनालयमध्ये कामाला आहे. रात्रीच शिर्डीला ये-जा करावी लागते. हा रस्ता कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात येतो. मात्र श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहुजी कानडे तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांना वारंवार नागरिकांनी सांगूनही या रस्त्याकडेदुर्लक्ष करत असल्याचा आरोप दोन्ही तालुक्यातील नागरिक करत आहे.