Ayodhya Ram Mandir : बीडच्या तरुणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याचा मेसेज
(Ayodhya Ram Mandir) बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याचा मेसेज बीडमधील एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याची माहिती मिळत आहे. या तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, मेसेज करणाऱ्या इसमाने स्वत:चे पाकिस्तानातील असल्याचा दावा करत कराची येथील लोकेशनही शेअर केलं. त्याचबरोबर, या कटात सहभागी होण्यासाठी तरुणाला एक लाख रुपयांची ऑफर दिली आणि आणखी 50 जणांची गरज असल्याचेही नमूद केले.
पोलिसांनी यासंदर्भात सायबर युनिटच्या मदतीने तपास सुरू केला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या राम मंदिराला आल्या आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावरून धमकी दिली होती, तर जानेवारी 2024 मध्ये आणि एप्रिल 2025 मध्ये ईमेलद्वारे धमक्या मिळाल्या होत्या. या नव्या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली असून यामागे नेमकं कोण आहे, हे तपासात स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे