BHR Scam : मुख्य आरोपी जितेंद्र कंडारेला बेड्या
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर येथे अटक करण्यात आले. त्याला आज पुणे विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इंदूर येथे एका वसतिगृहाच्या इमारतीत कंडारे वेषांतर करून राहत होता. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातील ही मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दराने हितचिंतकांना विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल १,२०० कोटींचा हा घोटाळा असून, सध्या हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या घोटाळ्यात मध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झंवर अजूनही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
इंदूरमधील एका वसतिगृहामध्ये कंडारे लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची पडताळणी करून घेतली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला बेड्या ठोकल्या. दुपारी आणि रात्री या दोन वेळेलाच तो जेवणासाठी खाली उतरायचा. सोमवारी (२८ जून) रात्री तो जेवणासाठी खाली आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कंडारेनं दाढी आणि मिशा वाढवल्या आहेत. त्यामुळे त्याचे रुप पूर्णपणे बदलले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हे रूपांतर करून घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

