SSC-HSC Exam Update: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्डाने केला 'हा' बदल

SSC-HSC Exam Update: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्डाने केला 'हा' बदल

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे.
Published by :
Team Lokshahi

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमआर गुणपत्रिकेत पाठवले जात होते. परंतु आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळाबर ऑनलाइन भरावे लागणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार केली आहे. त्यात मेकर आणि चेकरचा समावेश केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.

बोर्डाच्या (www.mahahsscboard.in) या संकेतस्थळावरुन परीक्षेचे गुण मंडळाकडे पाठवावे लागतील. त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. शाळेमधून एकापेक्षा जास्त युजर्स तयार करणे आवश्यक आहे. यानंतर, संबंधित युजरला विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करता येणार आहे. ऑनलाईन प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडतील. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीचे गुण शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना व प्राचार्यांना ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत.

प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊन शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आऊट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळांनी कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत, अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे गुण सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत. राज्य मंडळांनी ऑनलाईन गुण कसे भरावेत या संदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे.

दरम्यान, शाळेच्या युजरने विषयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केल्यानंतर ते तपासणीसाठी चेकरकडे पाठवले जाईल. त्यानंतर अंतिम गुण आणि श्रेणी मंडळाला पाठवता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, ऑनलाइन नोंदविलेल्या गुणांची प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापकांची सही आणि शाळेचा शिक्का सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करावा लागणार आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे काम शाळेच्या पातळीवर अद्यावत होणार आहे. यामुळे मंडळाकडील कामाचा ताण कमी होणार असून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व चेक करणार असल्यामुळे चुकांची शक्यता नसणार आहे. काळाप्रमाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत आहे. या अद्यावत प्रणालीमुळे वेळ वाचणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com