Rohit Pawar : भाजपा नेते राजन पाटील यांच्या मुलाचा अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ; रोहित पवार म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Rohit Pawar) निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे दोन अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या रिंगणात आहेत. मंगळवारी झालेल्या छाननी दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांना प्रचंड आनंद झाला आणि या आनंदात त्यांनी बोट दाखवत अजित पवार यांना थेट आव्हान देत म्हणाले की, 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही'. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, 'आदरणीय राजन पाटील साहेब,आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही.ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल.'
'मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि #महाराष्ट्र_धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा.' असे रोहित पवार म्हणाले.
Summery
अजित पवारांच्या पक्षाच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद
राजन पाटलांच्या मुलाचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ
रोहित पवार यांची प्रतिक्रिया
