Anant Chaturthi Guidelines | अनंत चतुर्थीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज

Anant Chaturthi Guidelines | अनंत चतुर्थीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज

Published by :

येत्या १९ सप्‍टेंबर २०२१ रोजी येणाऱ्या अनंत चतुर्दशी दशीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक ती सर्व व्‍यवस्‍था महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार इतक्या संख्येने संबंधीत कामगार – कर्मचारी – अधिकारी हे मुंबईकरांच्‍या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यार्थ उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली आहे.

उप आयुक्त काळे यांनी सांगितले की, कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून, याठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था असणार आहे. तसेच चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर विविध ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किना-यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी ५८७ 'स्टील प्लेट'ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत.
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

मार्गदर्शक सूचना

• सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इ. चा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणा-यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी.

• घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

• गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

• घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी 'कोविड-१९' या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.

• घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.

• विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

• शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

• सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर १० व्‍यक्तिंनी शक्‍यतो 'कोविड-१९' या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

• सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जना दरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

• सन २०२१ च्या गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

• मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

• नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

• महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

• मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

• विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मास्‍क / मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

• प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

• घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

• बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

• उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com