मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दादरा व नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत बोलताना, या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.
डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत मोठ्या प्रमाणात गाजला. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटसंदर्भात एसआयटी चौकशीची घोषणा देशमुख यांनी विधान भवनात केली होती. यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेलकर कुटुबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. डेलकर कुटुंबीयांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे ७ वेळा खासदार राहिलेले आहेत. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी अनेकांची नावं घेतली आहेत. प्रशासक पटेल यांचा त्रास असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला होता.