दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल चार दिवसात 'इतक्या' कोटींचा चरसचा साठा जप्त

दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल चार दिवसात 'इतक्या' कोटींचा चरसचा साठा जप्त

दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला.
Published by  :
Team Lokshahi

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रूपये इतकी आहे. चरसच्या पॅकिंगवरून अफगाणिस्तान, पाकिस्तानातून हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, ही कारवाई दापोली कस्टम विभाग आणि दापोली पोलीस यांनी संयुक्तपणे केली.

14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संवेदनशील ठिकाणी तसेच समुद्रकिनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाची करडी नजर होती. या गस्तीदरम्यान दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्दे किनाऱ्यावर एक बेकायदेशीर पॉली बॅग आढळून आली होती. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 10 संशयास्पद पॅकेट आढळून आली. त्याचे वजन सुमारे 11.88 किलोग्रॅम होते. त्या पिशवीमध्ये असणारा पदार्थ ओलसर होता. समुद्रातून किनाऱ्यावर वाहून आलेला असल्यामुळे तो ओलसर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पिशवीमध्ये असणाऱ्या पदार्थ हा वासावरून व पाहणी दरम्यान चरस असल्याचा संशय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आला होता. त्यांनी ड्रग्स डिटेक्शन टेस्ट किट द्वारे याची चाचणी केली असता सदर पदार्थ चरसच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दापोली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली केळशी ते बोऱ्यापर्यंतच्या किनारी भागात सखोल शोध घेतला.

14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुमारे 222.39 किलोग्रॅम चरस आढळून आला. या चरसाची अंदाजे किंमत 400 रुपये प्रति ग्रॅम या हिशोबाने सुमारे 8 कोटी 88 लाख 15 हजार 600 रुपये इतकी भरली. दापोली मधील मुरुड या ठिकाणी कासव मित्र सकाळी टेहळणीला गेले असता संशयास्पदरीत्या बॅग आढळून आली होती. त्यांनी दापोली पोलिसांकडे संपर्क साधून याची कल्पना दिली होती. त्याची शहानिशा केली असता त्यामध्ये 15 पिशव्या आढळून आल्या होत्या. त्याचे वजन 17.255 किलो इतके भरले होते. त्याची अंदाजे किंमत 69 लाख 2 हजार रुपयांच्या घरात होती.

पुन्हा 16 ऑगस्ट रोजी दापोली पोलिसांना हर्णे नवानगर परिसरात बेवारस स्थितीत बॅग आढळून आली होती. त्यामध्ये सुमारे 8 किलो चरस आढळून आले. ज्याची किंमत 32 लाख रुपयांच्या घरात होती. दापोली पोलिसांनी सुमारे 25.255 किलोग्रॅम चरस साठा जप्त केला होता. सीमा शुल्क विभाग दापोली यांच्या माध्यमातून 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली असता 15 ऑगस्ट रोजी कर्दे ते लाडघर बीच यादरम्यान त्यांना 34.91 किलोग्रॅम चरस साठा सापडला. ज्याची अंदाजे किंमत एक कोटी 36 लाख 36 हजार 400 च्या घरात जाते. 16 ऑगस्ट रोजी केळशी बीच येथे 24.99 किलोग्रॅम चरस साठा सापडला. त्याची अंदाजे किंमत 96 लाख 39 हजार 600 च्या घरात जाते. 16 ऑगस्ट रोजी कोळथरे बीच या ठिकाणी 13.4 किलो ग्रॅम साठा आढळला. त्याची किंमत 52 लाख 160 च्या घरात जाते. 17 ऑगस्ट रोजी मुरुड बीच येथे 14.41 किलोग्रॅम चरस साठा सापडला. त्याची अंदाजे किंमत 56 लाख 16 हजार 400 होते.

17 ऑगस्ट रोजी बुरोंडी ते दाभोळ या दरम्यान 100.95 किलोग्रॅम चा चरस साठा सीमा शुल्क विभागाला आढळून आला. याची अंदाजे किंमत 4 कोटी 38 हजारच्या घरात जाते. 17 ऑगस्टरोजी बोऱ्या या ठिकाणी दापोली सीमा शुल्क विभागाला 21.85 किलोग्राम साठा आढळून आला. याची किंमत 84 लाख 34 हजार रुपयांच्या घरात जाते. दापोली पोलीस आणि सीमा शुल्क विभाग दापोली यांनी केलेल्या कारवाईत एकूण 247.645 किलोग्रॅम चरस साठा जप्त करण्यात यश आलेले आहे. याची एकूण किंमत 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रुपयांच्या घरात जात आहे. या पाकिटांच्या पॅकिंग वरून सदर चरस हे अफगाण व पाकिस्तान या देशातील मूळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com