Shahu Maharaj|कोल्हापूर 100 सेकंदासाठी होणार स्तब्ध, 'राजर्षी शाहू महाराजांना' अनोख्या पध्दतीने आदरांजली
आपल्या महान कार्याने संपूर्ण देशामध्ये सामजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची (Rajarshi Shahu Maharaj) आज 100वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांकडून (Kolhapur) शाहू महाराजांना अनोख्या पध्दतीने आदरांजली वाहण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता संपूर्ण कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळणार आहे.
6 मे 1922 या रोजी मुंबई येथील पन्हाळा लॉज (Panhala Lodge) या ठिकाणी शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिवसाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध ठेवून शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. म्हणजेच सर्व व्यवहार 100 सेकंद थांबून रत्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदना प्रथमच साकारले जाणार आहे. या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी, समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान दिलं आहे, काय कार्य केलं आहे त्याचं स्मरण केले जाणार आहे.
शाहू महाराजांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू महाराजांना आदराजंली वाहण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत. शाहू मिल मध्ये सकाळी साडे दहा वाजता हे कार्यक्रम होणार आहे.