Latur : लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण; सूरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल
(Latur) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान लातूरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पत्ते फेकून निषेध नोंदवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
याच पार्श्वभूमीवर सुरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक असे दोन पथके सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
जोपर्यंत सुरज चव्हाण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी छावा संघटनेची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.