खर्डी ता. पंढरपूर येथील चव्हाण मळा येथे केवळ 14 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचा बालविवाह (Child Marriage) करण्यात आला. याची माहिती मिळताच पंढरपूर (Pandharpur) तालुका पोलिसांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. याचबरोबर या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह लग्नास उपस्थित असणारे सुमाऱ्या 200 जनांविरोधात ग्रामसेवक (Gramsevak) भगवान कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (child marriage in Pandharpur)
खर्डी येथे बालविवाह झाल्याची माहिती पोलिसांना समजताच ग्रामसेवक भगवान कुलकर्णी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवरी मुलगी ही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे निदर्शनास आले. नवरी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केली असता ते उडवा-उडवीचे उत्तर देवू लागले. मुलीचा जन्मदाखला पाहिल्यावर मुलगी ही केवळ 14 वर्षे 8 महिन्यांची असल्याचे स्पष्ठ झाले. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुढील तपास जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक मिलींद पाटील, स.पो.नी आदीनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका योगिराज खिलारे करत आहेत. पंढरपूर तालुक्यात कोठेही बालविवाह होत असतील तर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी यावेळी केले आहे.