नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

Published by :

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या मंत्र्यांपैकी नारायण राणे यांची यात्रा फारचं वादाची ठरली. या यात्रेत शिवसेना विरूद्ध वाद चांगलाच पेटला होता. नारायण राणे यांच्या यात्रेवर आता थेट नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे आशीर्वाद. या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद द्या हो… आशीर्वाद द्या हो… कशासाठी देऊ? काय नाही… असेच द्या… असे नाही आशीर्वाद मिळत. या कामातून आशीर्वाद मिळतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com