January Weather: जानेवारीतही थंडीच्या लाटा कायम, पारा राहिल सरासरीच्या खाली
डिसेंबर महिन्यात छळणाऱ्या थंडीपासून जानेवारीतही विशेष दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. थंडीची तीव्रता काहीशी कमी असली तरी त्याचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य भारतासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जानेवारी महिन्यात एक ते दोन वेळा थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जानेवारी ते मार्च २०२६ या काळातील हवामानाविषयीचे दीर्घकालीन निरीक्षण जारी केले. या अहवालानुसार जानेवारी महिन्यात उत्तर भारत आणि मध्य भारतात रात्रीचे किमान तापमान मासिक सरासरीपेक्षा खालीच राहण्याची शक्यता आहे. यात विदर्भासह उत्तर-पश्चिम भारतातील पूर्व व पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि लद्दाखचा समावेश आहे. मध्य प्रदेश, झारखंड आणि विदर्भ या भागातही किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
या भागांत थंडीच्या लाटा येण्याची शक्यता नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. मध्य भारतात नागरिकांना एक ते दोन वेळा थंड लाटेचा सामना करावा लागू शकतो. मात्र याउलट मध्य भारतात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिवस उबदार आणि रात्री अधिक थंड असा अनुभव येऊ शकतो.
पूर्वोत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मात्र तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांत थंडीचा प्रभाव तुलनेने कमी जाणवेल. एकूणच जानेवारी महिन्यात उत्तर आणि मध्य भारतातील नागरिकांनी थंडीच्या लाटांसाठी सज्ज राहण्याचे संकेत हवामान विभागाच्या अंदाजातून मिळत आहेत.
