Harshwardhan Sapkal: 'जनाची नाही तर मनाची तरी बाळगा', हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगावर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला. सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले असून, निवडणूक आयोग प्रामाणिक नसल्याचेही सांगितले. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या दावणीला बांधलेला असल्याने आयोगाने गुन्हा दाखल केला नाही, असे सपकाळ म्हणाले. विधानसभा अध्यक्ष, सभापती आणि राज्यपालांसारख्या संवैधानिक पदांवर असणाऱ्यांनी अराजकीय भूमिका घ्यावी, पण नार्वेकर हे गुंडगिरी करत आहेत, असे त्यांनी सांगितले. सपकाळ म्हणाले की, नार्वेकर यांनी विरोधी पक्षाच्या व्यक्तीला धमकावले, देहबोली आणि वर्तन खालच्या पातळीचे होते.
कुटुंबातील व्यक्ती बिनविरोध निवडून याव्यात म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दरवाजा अडवला, विरोधकांना अर्ज भरू दिला नाही. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावणे आणि सुरक्षा काढण्याचे आदेश देणे हे अशोभनीय आहे. नार्वेकर स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजत आहेत. निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार सुरू झाला असून, बिनविरोध निवडणुका लोकशाहीला धोका आहेत, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर बोलताना सपकाळ म्हणाले की, सत्तेतील लोक भ्रष्ट असल्याने कारवाई होत नाही. पवार यांनी मोदी आणि फडणवीस यांना आव्हान दिले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिल्याचा पवार यांचा खुलासा गंभीर आहे. हा पासपोर्ट कायदा १९६७ चा भंग असून, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. मोहोळ यांचा राजीनामा आणि सीबीआय चौकशीची मागणी सपकाळ यांनी केली.
