COVID19 | राज्यात कोरोनाचा कहर

COVID19 | राज्यात कोरोनाचा कहर

Published by :
Published on

देशाच्या काही भागांमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणत वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यादरम्यान रुग्णसंख्येने देशवासियांची चिंता वाढवली आहे.

मागील २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच करोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.

राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ दैनंदिन रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. मात्र, आता रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधताना ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर दुजोरा दिला आहे. या ट्विटमध्ये ४५ वर्षांवरील सर्वांनाच सरसकट #COVID19 प्रतिबंधक लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केलेली मागणी योग्य आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी केंद्राने या मागणीबाबत तातडीने सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित आहे. असे लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com