भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याचं प्रकरणात भाजप नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पुण्यात अशाचप्रकारे राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्य्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व इतरांनी रविवारी सकाळी टिळक चौकात सरकारच्या विरोधात विनापरवानगी एकत्र येऊन आंदोलन केले. कोरोनामुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. याची त्यांना पोलिसांनी माहिती दिली. तसेच, लेखी व तोंडी समजावून सांगितले. तरीही आदेशाचे उल्लंघन करून चौकात आंदोलन करत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी न घेता इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार संतोष तुर्के यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येणपुरे, सुशिल मेंगडे, संदीप खेडकर, धीरज घाटे,दीपक पोटे, प्रमोद कोंढरे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे अशा ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

