मुंबईत भर दुपारी अंधार, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
राज्यभरात गणेश विसर्जनासाठी धामधूम सुरु आहे. मात्र मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.
मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस दिसून आला. अंधेरी परिसरात पावसाचा जोर इतका होता की त्यामुळे दृष्यमानताही कमी झाली. त्याशिवाय विजांचा कडकडाटही भीतीदायक होता.
दरम्यान, हवामान खात्याने आज राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार दुपारनंतर राज्याच्या विविध भागात पाऊस बरसला. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. तो वरुणराजाने खरा ठरवला.
याशिवाय कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टी भागात हलका तो जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.