11th Online Admission : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत वाढवली
(11th Online Admission ) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून शिक्षण विभागाने विशेष फेरीसाठी मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
यंदा अकरावी प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन होत असून, राज्यातील जवळपास 9,525 कनिष्ठ महाविद्यालयांत 21 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यापैकी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी करून प्रवेश घेतला आहे.
"Open to All" या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना 15 ते 17 ऑगस्टदरम्यान नोंदणी व अर्ज सुधारणा करण्याची सुविधा देण्यात आली होती. या फेरीची निवड यादी 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. सुरुवातीला 19 ते 20 ऑगस्ट हा प्रवेशाचा कालावधी निश्चित होता, मात्र हवामानामुळे आता ही मुदत दोन दिवसांनी वाढवून 22 ऑगस्ट करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.