डॉ. आंबेडकर संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्राकडून दिरंगाई, 5 वर्षांत केवळ निम्मी रक्कम प्राप्त

डॉ. आंबेडकर संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्राकडून दिरंगाई, 5 वर्षांत केवळ निम्मी रक्कम प्राप्त

Published by :
Published on

नागपूरजवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासाठी केंद्र सरकारने 4.25 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला. मात्र गेल्या 5 वर्षांत केवळ निम्मी रक्कमच केंद्राकडून प्राप्त झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने नागपूर येथील शांतीवन, (चिंचोळी) येथील बाबासाहेबांच्या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी 2016मध्ये 17.3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी पहिला हप्त्याचा 4.25 कोटी रुपयांचा निधी नोव्हेंबर 2016 मध्ये दिला. दुसऱ्या हप्त्याचा 4.25 कोटी रुपयांचा निधी आता 17 फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात आला. 6 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकार कडून मंजूर निधीच्या केवळ निम्मीच रक्कम प्राप्त झाली आहे. यावरून या पुनर्निर्माणासाठी केंद्राकडून दिरंगाई केली जात आहे, असे दिसून येते.

शांतीवन, चिंचोळीच्या संग्रहालयाचे लोकार्पण 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल, अशी अपेक्षा डॉ. आंबेडकर फॉऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाची वैशिष्ट्ये
शांतीवनमधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत जवळपास 400 पेक्षा अधिक वस्तू आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकिली करीत असतानाचा बॅरिस्टर गाऊन येथे आहे. त्यांची हस्तलिखीत पत्रे, ग्रामोफोन, छडी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपरायटर अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com