स्वातंत्र्यानंतरही सोयी सुविधांपासून वंचित; रुग्णांना करावा लागतोय डालग्यातून प्रवास
प्रशांत जगताप, सातारा | देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र देशात अजूनही अशी गाव आहेत, जी सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अशाच गावांमध्ये साताऱ्याच्या महाबळेश्वर येथील दुर्गम असलेल्या कोंडोशी गावाचा समावेश होतो. या गावात रस्त्याअभावी रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी डालाचा वापर करावा लागतोय. खांद्यावर घेऊन तब्बल 5 किलोमीटरची पायपीट करून कुमठे येथे नेण्यात येते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही कोंडोशीमध्ये आजही गावकऱ्यांचे हाल होत असून सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कोंडोशी गावातील रस्त्याचे काम गेले 40 वर्षांपासून अपूर्णच आहे. राशन, बँकेची कामे, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, ही कामे करायची असल्यास त्यांना कुमठे-पार या गावांपर्यंत 5 ते 6 किमी अंतर चालत येऊन खाजगी वाहनाने किंवा वडाप हा पर्याय निवडावा लागतो.रुग्णाला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं असेल तर डालामध्ये बांधून त्याला खांद्यावर घेऊन कुमठे-पार पर्यंत चालत जावे लागत असल्याने गावकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. खराब रस्त्यामुळे गरोदर स्त्रीचा जीव धोक्यात घालून तिची प्रसूती आजही घरीच करावी लागत आहे.
कोंडोशी गावच्या 75 वर्षीय वृद्ध महिला गोपाबाई सखाराम जाधव यांना रस्त्याअभावी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी डालाचा वापर करावा लागला.. खांद्यावर घेऊन 5 किलोमीटरची पायपीट करून कुमठे येथे नेण्यात आले.. त्यानंतर पुणे येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रस्त्यावर दरड कोसळल्याने गावकऱ्यांना रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या असून अद्याप देखील रस्ता व्यवस्थित नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहेत.
साधारण 160 ते 170 लोकसंख्या असलेल्या कुमठे कोंडोशी गावकाऱ्यांसाठी ही एक परंपरा होऊन गेली आहे.. 6 किलोमीटर रस्त्यासाठी 40 वर्षे वाट बघावी लागत असल्याने प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचे गावकरी सांगताहेत.