उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूरला 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण

उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूरला 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण

पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्व सुख-सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

अभिराज उबाळे | पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी 2700 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणानंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली कॉरिडॉर राबवला जाणार का? अशी शंका आता व्यक्त होऊ लागलीय.

उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूरला 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण
महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय - छगन भुजबळ

मागील आठ ते दहा महिन्यापासून पंढरपूरमध्ये कॉरिडॉरचा विषय गाजतोय. मंदिर परिसरात 200 मीटरमध्ये कॉरिडोर राबवणार जाणार असल्याचे सांगितले जात होते. यामध्ये शेकडो राहती घरे दुकाने उद्ध्वस्त होणार होती. आपल्या घरावरच बुलडोझर फिरणार या भीतीने मंदिर परिसरातील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी या प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध केला. पंढरपूरकरांच्या या विरोधानंतर सरकारने स्थानिकांना विकासात घेऊन विकास कामे करू असे जाहीर केले. त्यानंतर हा विषय मागे पडला होता. मात्र अचानक उपमुख्यमंत्र्यांनी इतक्या मोठ्या निधीची घोषणा केल्याने पंढरपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलय.

पंढरपूरकरांच्या विरोधानंतर प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना त्यांचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. सध्या सरकारकडे स्थानिकांचा विकास आराखडा आणि प्रशासनाचे तीन आराखडे प्रस्तावित आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेले 2700 कोटी रुपयांमधून नक्की कोणता विकास आराखडा राबवला जाणार आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक प्रशासनाकडे देखील याची माहिती नाही. त्यामुळे यामध्ये संभ्रम अधिक वाढला आहे.

दरम्यान, पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्व सुख-सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याला पंढरपूरकरांचा देखील विरोध नाही. मात्र भाविकांना सुख सुविधा देण्याच्या प्रयत्नात पंढरपूरकर उद्ध्वस्त होऊ नये, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com