Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार
(Ganpatipule Temple ) कोकणातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या स्वयंभू गणपती मंदिरात आता भाविकांसाठी विशेष ड्रेसकोड जारी करण्यात आला आहे. गणेशोत्सवापासून हा ड्रेसकोडचा नियम या मंदिरात लागू होणार असून आता गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घ्यायला जायचे असेल तर योग्य असेच आणि आपल्या संस्कृतीला साजेसे कपडेच घालावे लागणार आहेत.
गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक रोज गणपतीपुळेच्या मंदिरात येत असतात. रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या मंदिर प्रशासनाने ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सवापासून या नियमाची सुरुवात करणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भात गणपतीपुळे मंदिराची पंच समिती लवकरच एक बैठक आयोजित करणार असल्याची माहिती मिळत आहे.