E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं
थोडक्यात
राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा
जुलै महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नियम लागू
पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं निश्चित
(E Bike Taxi )राष्ट्रात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेचा मार्ग अखेर खुला झाला आहे. परिवहन विभागाने ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025’ अंतर्गत या सेवेला मान्यता दिली असून, उबर, रॅपिडो आणि ओला या कंपन्यांना सुरुवातीस 30 दिवसांसाठी तात्पुरते परवाने देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ही सेवा सुरु होणार असून, पहिल्या 1.5 किमी प्रवासासाठी 15 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीकरिता 10.27 रुपये भाडे ठरवण्यात आले आहे.
राज्य सरकारने एप्रिल महिन्यात 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही कंपन्यांना पुढील 30 दिवसांत सर्व अटींची पूर्तता करून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पक्क्या परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी किमान 50 इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध करणे बंधनकारक असेल.
नियमावलीनुसार, केवळ इलेक्ट्रिक बाईकलाच परवानगी असेल. 12 वर्षांवरील प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी रायडर आणि प्रवाशामध्ये विभाजक अनिवार्य ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिरिक्त सुरक्षा कवच वापरणे आवश्यक राहील. प्रत्येक ट्रिपचे कमाल अंतर 15 किलोमीटर निश्चित केले गेले असून, सेवा फक्त मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारेच उपलब्ध असेल. प्रवाशांची माहिती गोपनीय ठेवण्याचे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.
चालकांसाठीही काही कठोर नियम आखण्यात आले आहेत. वैध ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रान्सपोर्ट बॅज आणि 20 ते 50 वर्षे वयोगट अनिवार्य आहे. कामाचे तास दररोज 8 तासांपर्यंत मर्यादित राहतील. तसेच रायडर्सना शहराच्या हद्दीत जास्तीत जास्त 4 व बाहेरील भागात 2 राइड्स देण्याची परवानगी असेल.