ढगाळ हवामानाचा केळी पिकावर परिणाम

ढगाळ हवामानाचा केळी पिकावर परिणाम

शेतकऱ्यांनी केळीचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपायोजना करण्याच्या जिल्हा कृषी विभागाच्या सूचना
Published by :
Team Lokshahi
Published on

जळगाव: जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस व वाढत्या आद्रतेमुळे केळीच्या पिकावर सीएमव्ही व मोजॅक कुकुंबर व्हायरस सारख्या रोगांचा धोका वाढला आहे. या रोगामुळे केळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे केळीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. केळी पिकाचे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना याबाबत तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, व जळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून सीएमव्ही व मोजॅक कुकुंबर व्हायरस सारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ढगाळ वातावरण पावसाची संततधार व वाढत्या आद्रतेमुळे केळीवर मावा किडी व पांढरी माशीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होत असून प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात या रोगांच्या प्रादुर्भावाची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहून उपायोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

सीएमव्ही व मोजॅक कुकुंबर व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

* शेतकऱ्यांनी दररोज शेतात फेरफटका मारून केळीची पाहणी करावी.

* एखादं झाड कोमजलेलं किंवा त्या झाडाला पिवळसर पान आलेली असल्यास तात्काळ ते काढून नष्ट करावे.

* कोमजलेले किंवा पिवळसर पानं आलेल्या झाडाला एक महिन्यापूर्वी सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला होऊ शकतो.

* प्रादुर्भाव झालेल्या झाडांपासून इतर झाडांवर प्रादुर्भाव होतो.

* त्यामुळे असे झाड तात्काळ काढून योग्यरीत्या नष्ट केल्यास इतर झाडांचा बचाव केला जाऊ शकतो.

* मावा किडी व पांढरी माशी यांना अटकाव केल्यास सीएमव्ही व मोजॅक कुकुंबर व्हायरस टाळता येऊ शकतो.

* प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी अर्क किंवा सौम्य कीटकनाशकांची केळीवर फवारणी करावी.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com