Anti-Narcotics Task Force : अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
थोडक्यात
अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची स्थापना
राज्य सरकारचा निर्णय
फोर्ससाठी 22 कोटी 36 लाखांची मंजुरी
(Anti-Narcotics Task Force) राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या रॅकेटवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहखात्याने या उपक्रमासाठी 22 कोटी 36 लाख रुपये मंजूर केले आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अमली पदार्थांची विक्री आणि सेवनाचा मुद्दा गाजला होता. सदस्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले. सभागृहात दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात अमली पदार्थांच्या विक्रीत तब्बल 481 टक्के वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी 30 दिवस चाललेल्या विशेष मोहिमेत सुमारे 140 कोटी 20 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सरकारवर कारवाईची मागणी जोर धरू लागली.
या चर्चेला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याची घोषणा केली होती. आता ही घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे. या फोर्समध्ये 346 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत.
यात पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई आणि चालक यांचा समावेश असेल. विविध स्तरांवर प्रशिक्षित कर्मचारी नेमल्याने कारवाईची गती वाढेल. सरकारच्या या निर्णयामुळे अमली पदार्थांच्या विक्रीवर आळा बसून तरुण पिढीला या धोकादायक प्रवृत्तींपासून वाचवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.