आरोग्य विभागाच्या ९,५०० हून अधिक पदांसाठी परीक्षा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 'गट क' आणि 'गट ड' संवर्गांतील विविध पदांसाठीच्या भरती परीक्षा २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत. या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या पात्र परीक्षार्थींना परीक्षा प्रवेशपत्र वितरीत करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात होणारी ही परीक्षा काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. नुकतेच या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.यातील 'गट क' संवर्गासाठीची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रांमध्ये पार पडेल, तर 'गट ड' संवर्गासाठीची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी एकाच सत्रात घेतली जाईल. राज्यभरातील १ हजाराहून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा राज्य शासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पडेल.
दोन परीक्षा केंद्रे दिल्याचे आरोप फेटाळले
एकाच परीक्षार्थीला दोन सत्रांसाठी दोन स्वतंत्र परीक्षा केंद्रे दिल्याचा आरोप करत प्रवेशपत्रांबाबत चुकीची माहिती देऊन परीक्षा प्रक्रियेविषयी गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत या परीक्षांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'न्यासा कम्युनिकेशन'ने हे आरोप फेटाळले असून परीक्षार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.