चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेच्या कालावधीत वाढ
अनिल ठाकरे, चंद्रपूर: गेल्या आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वीज इंटरनेट सेवा खंडित झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनांसाठी वेळेत नोंदी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेत राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांना पत्र पाठवून पंतप्रधान पिक विमा योजनेच्या कालावधीत वाढ करण्याची विनंती केली होती. मंत्री मुनगंटीवार यांची ही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने केंद्रीय सचिव मनोज आहुजा यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.
आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ६३ हजार २६३ शेतकऱ्यांनी २ लक्ष ८८ हजार ४७ हेक्टर वरती ३ लक्ष १० हजार २८७ अर्जाद्वार जवळपास पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ७२.८७ टक्के शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजना संरक्षित केली आहे. ही वाढ आजवरच्या पिक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत जवळपास ४५० टक्के भर झाली आहे.
केंद्र सरकारची पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून राज्य सरकारने हा पिक विमा केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहेत. अतिवृष्टी, नैसर्गिक हानी झाल्यास शेतकऱ्यांना एक प्रकारे पंतप्रधान पिक विमा योजनेचे कवच प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे