Eknath Shinde
EKNATH SHINDE ATTACKS THACKERAY GROUP WITH SHAYARI AT SHIV SENA FELICITATION EVENT

Eknath Shinde: शिवसेनेच्या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर खोचक शेरोशायरी, नकली सब घर पर बैठे है...

Thackeray Vs Shinde: शिवसेना शिंदे गटाच्या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी शेरोशायरीतून ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगराध्यक्षा, नगरसेवक आणि नगरसेविकांचा सत्कार सोहळा मुंबईतील दादर येथे भव्यरित्या आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शेरोशायरीतून टीका केली.

शिंदे यांनी जिंकलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची यादी वाचून दाखवताना सांगितले की, हा विजय ऐतिहासिक आहे. "नकली सब घर पर बैठे है, असली सब मेरे सामने बैठे है. बरोबर आहे की नाही?" असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर थेट कोपरखळी मारली. पुढे ते म्हणाले, "मी नेहमीच सांगतो, सत्य परेशान हो सकता है, पण सत्य पराजित नाही हो सकता. म्हणूनच सच्चा जिता, हार गया झुठा, जनताने दिया उबाठा को दिया जमाल गोठा."

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आणखी स्पष्ट केले की, "पोट दुखी-पोट दुखी, परंतु ही किती पोट दुखी. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला पटत नाही. घटनाबाह्य, घटनाबाह्य, पद जाणार, मुख्यमंत्रीपद जाणार, सरकार पडणार, असा कोलाहिस करणाऱ्यांना मी उत्तर देतो की, अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केले आहे.

मला वाटतं त्या काळात मी अडीच तास तरी नीट झोपलो नसेल." लोकांना उत्तर देताना ते म्हणाले, "मी झोपायला नाही, तर लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ताच आहे." या शेरोशायरीने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली असून, शिंदे गटाच्या विजयाला नवे बळ मिळाले आहे. ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com