Municipal Elections: सून जिंकली, सासू हरली… भाऊ जिंकले, बहिणीही सोबत! नगर परिषद–नगर पंचायत निवडणुकीत नात्यागोत्यांची कसोटी
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून, या निकालांनी केवळ राजकीय पक्षांचे गणितच नव्हे तर अनेक कुटुंबांमधील नातेसंबंधांचीही परीक्षा घेतल्याचे चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी सून विजयी ठरली तर सासूला पराभव स्वीकारावा लागला, तर कुठे भाऊ-बहिणी एकत्र विजयी झाल्या. एकाच घरातील उमेदवारांमध्ये कुणाच्या गळ्यात जयमाला पडली तर कुणाच्या पदरी पराभव आला.
या निवडणुकीत महायुतीने राज्यभरात वर्चस्व सिद्ध करत मोठे यश मिळवले आहे. राज्यात एकूण 214 नगराध्यक्षपदांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. याउलट महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावे लागले असून, स्थानिक आघाड्यांचे 25 उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपच्या तब्बल 117 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
पैठणमध्ये सून जिंकली, सासू हरली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या विद्या भूषण कावसानकर यांनी भाजपच्या उमेदवार लोळगे यांचा 160 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मात्र याच कुटुंबात वेगळे चित्र दिसले. भाजपकडून नगरसेवकपदासाठी मैदानात उतरलेल्या जयश्री चाटूपळे यांना शंभर मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पैठणमध्ये सून विजयी तर सासू पराभूत अशी राजकीय चर्चा रंगली.
बदलापूरमध्ये एकाच घरातील सहा उमेदवार
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबाला संमिश्र निकालाचा सामना करावा लागला. एकाच घरातील सहा जण रिंगणात होते. यापैकी वामन म्हात्रे, त्यांचे बंधू तुकाराम म्हात्रे आणि उषा तुकाराम म्हात्रे यांनी विजय मिळवला. मात्र वामन म्हात्रे यांचा मुलगा वरुण म्हात्रे, भावेश म्हात्रे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या पत्नी वीणा म्हात्रे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे बदलापूरमध्ये एका घरात आनंद आणि निराशा दोन्ही एकाच वेळी पाहायला मिळाली.
करमाळ्यात भाऊ-भावजय-बहिणीचा जल्लोष
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपालिकेत मात्र भाजपच्या कुटुंबीयांनी एकत्रित विजय साजरा केला. भाजपकडून निवडणूक लढवणारे लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड हे तिघेही विजयी ठरले. भाऊ, भावजय आणि बहिणीचा एकाच वेळी विजय झाल्याने करमाळ्यात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.
एकूणच या निवडणुकांनी राजकारणात नात्यागोत्यांचे समीकरण किती गुंतागुंतीचे असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. कुठे घराघरात आनंदाचा उत्सव झाला, तर कुठे एकाच छताखाली विजय आणि पराभवाची वेदना एकत्र अनुभवावी लागली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय चित्राबरोबरच अनेक कुटुंबांच्या राजकीय भवितव्यालाही नवी दिशा दिली आहे.
