विमान तिकिटाच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक
मुंबई : परदेशात कामासाठी जात असलेल्या एका व्यापाऱ्याला कमी दरात तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने त्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत व्यापाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून विनोबा भावेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हरिस सिद्दिकी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते कुर्ला पश्चिमेत राहतात. नेदरलँडमध्ये काही साहित्याच्या प्रदर्शनासाठी हरिस यांना जायचे होते. त्यानुसार त्यांनी तिकीट आरक्षणासाठी ऑनलाइन क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली. यावेळी आरोपीने त्यांना एक लाख ४१ हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. त्यानुसार हरिस यांनी आरोपीला तत्काळ हे पैसे पाठवले. मात्र नेदरलँड येथे गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पुढे जाण्यासाठी विमानाचे तिकीट तसेच येण्यासाठी आणि हॉटेलचे काहीही आरक्षण आरोपीने केलेले नव्हते. आरोपीला संपर्क साधला असता, त्याचा मोबाइल बंद होता. अखेर मुंबईत आल्यानंतर हरिस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.