Mumbai Politics: मैत्रीचं रूपांतर थेट राजकीय संघर्षात; दहिसर प्रभाग २ मध्ये तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. कारण या प्रभागात एकेकाळी अतिशय जवळच्या मानल्या जाणाऱ्या दोन महिला नेत्यांमध्ये थेट राजकीय लढत रंगणार आहे. भाजपकडून तेजस्वी घोसाळकर, तर शिवसेना (ठाकरे गट) कडून धनश्री कोलगे या एकमेकींच्या विरोधात रिंगणात उतरल्या आहेत.
ठाकरे गटाने आखलेल्या या रणनीतीकडे केवळ उमेदवारी म्हणून नव्हे, तर राजकीय संदेश देणारी मोठी खेळी म्हणून पाहिले जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात त्यांची जुनी मैत्रीण आणि स्थानिक पातळीवर सक्रिय असलेली धनश्री कोलगे यांना संधी देत ठाकरे गटाने ही लढत अधिक चुरशीची केली आहे.
‘टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरचा कार्यकर्ता’
उमेदवारी जाहीर होताच धनश्री कोलगे यांनी आपली भूमिका ठाम शब्दांत मांडली आहे. त्यांनी या निवडणुकीकडे केवळ पक्षीय संघर्ष म्हणून न पाहता, “निष्ठावंत विरुद्ध गद्दार”, “टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा चेहरा” आणि “बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार” अशा शब्दांत या लढतीचे वर्णन केले आहे. “मी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात सातत्याने काम करते आहे. नागरिकांशी माझा थेट संपर्क आहे. येथील प्रश्न, समस्या आणि अपेक्षा मला माहीत आहेत,” असा दावा धनश्री कोलगे यांनी केला आहे.
घोसाळकर कुटुंबीयांचा मुद्दा प्रचारात
या निवडणुकीत आणखी एक संवेदनशील मुद्दा चर्चेत आला आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. त्यामुळे हा ‘घरातील राजकारणाचा’ मुद्दा प्रचारात रंगेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र यावर धनश्री कोलगे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
“तेजस्वी घोसाळकर या घोसाळकर कुटुंबातील सून असतील, पण माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आणि पाठिंबा आहे. त्यांनी कधीही आमच्याबाबत अविश्वास दाखवलेला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
स्थानिक प्रश्नांवरच निवडणूक लढणार
साम टीव्हीशी बोलताना धनश्री कोलगे यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत व्यक्तीपेक्षा कार्य, निष्ठा आणि स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. “प्रभाग २ मध्ये विकासकामे, नागरी सुविधा, पाणी, स्वच्छता, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरच आम्ही प्रचार करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
चुरशीच्या लढतीचे संकेत
प्रचाराची अधिकृत सुरुवात होताच दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. मैत्रीपासून सुरू झालेली ही कहाणी आता थेट राजकीय संघर्षात बदलली असून, दहिसर प्रभाग क्रमांक २ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी होणार, यात शंका नाही.
